पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उघडकीस आलेल्या विषारी दारू विक्री प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा आणि योग्य पर्यवेक्षणाचा अभाव आढळून आल्याने एकूण 9 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणात 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध विषारी दारू विक्रीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
तसेच, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दापोडी पोलीस चौकीशी संबंधित प्रकरणात 6 अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या कारवाईत एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक फौजदार आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
प्राथमिक चौकशीत वरिष्ठ स्तरावरील देखरेखीचा अभाव आणि कर्तव्यातील हलगर्जीपणा समोर आल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अवैध दारू व्यवसायाविरोधात पुढेही कठोर मोहीम राबविण्यात येणार असून दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. या कारवाईमुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस दलात जबाबदारी निश्चित करण्याचा स्पष्ट संदेश गेला आहे.













