
महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा गाव. दलित समाज. वडील पोलीस कॉन्स्टेबल. घरात शिक्षणाची आस होती. कल्पना हुशार होती. शाळेत जायची. स्वप्ने होती.
पण वयाच्या बाराव्या वर्षी लग्न लावून दिले.
मुंबईच्या उल्हासनगरच्या झोपडपट्टीत सासर होते. दहा बाय पाच फुटाच्या खोलीत बारा ते पंधरा माणसे. तिथे तिच्यावर अत्याचार झाले. मारहाण झाली. रोज छळ. ती इतकी खंगली की एक दिवस वडील अचानक भेटायला आले तेव्हा त्यांनी मुलीला ओळखलेच नाही.
त्यांनी त्याच दिवशी तिला घरी आणले.
गावी परतल्यावर टोमणे सुरू झाले. परत आलेली सून म्हणजे गावासाठी विषय. ते असह्य झाले. एक दिवस तिने उंदीर मारण्याचे विष प्यायले. तीन बाटल्या.
वाचली. सरकारी हॉस्पिटलमध्ये वाचली.
शुद्धीवर आल्यावर तिने एकच ठरवले. आता जगायचे. आणि जगणे म्हणजे फक्त श्वास घेणे नाही. काहीतरी करून दाखवायचे.
मुंबईला आली. गारमेंट फॅक्टरीत काम केले. रोज दोन रुपये मिळायचे. दोन रुपये. पण ती शिकत राहिली. बघत राहिली. समजून घेत राहिली.
१९८४ मध्ये ५० हजार रुपये कर्ज काढले. शिवणकाम सुरू केले. फर्निचरचा व्यवसाय केला. रिअल इस्टेटमध्ये उतरली. जमीन litigation मध्ये नाव कमावले. धमक्या आल्या. पण ती डगमगली नाही. १९९८ पर्यंत तिचा property व्यवसाय ४ कोटींवर पोहोचला होता.
आणि मग आली कमानी ट्यूबस ची गोष्ट.
रामजीभाई कमानी यांनी स्वातंत्र्यानंतर कुर्ल्यात तीन मोठ्या कंपन्या उभ्या केल्या होत्या. Kamani Tubes त्यातील एक. पण त्यांच्या निधनानंतर मुलांमध्ये भांडणे झाली. कंपनी बुडाली. कोर्टाने कंपनीची मालकी चक्क कामगार संघटनेकडे दिली. भारतातील हा पहिलाच असा प्रसंग होता. पण कामगारांनाही कंपनी चालवता आली नाही. वर्षानुवर्षे कंपनी बंद पडली.
२००१ साली कंपनी liquidation मध्ये गेली. ११६ कोटी रुपयांचे कर्ज होते. १४० हून अधिक कायदेशीर खटले होते. तीन वर्षांपासून ३५०० कामगारांना पगार नव्हता.
हे कामगार कल्पनाकडे आले.
त्यांनी सांगितले, ताई, आमची मुले उपाशी आहेत. तीन वर्षांपासून एक पैसाही मिळाला नाही. तू वाचव आम्हाला.
त्या कामगारांची परिस्थिती पाहून कल्पनाचे मन हलले. तिने ५० लाखांचा signed cheque देऊन नविनभाई कमानी कडून कंपनी ताब्यात घेतली.
सगळे म्हणाले, हे suicide mission आहे. ही बाई वेडी आहे.
पण कल्पनाला माहीत होते उपाशी राहणे म्हणजे काय असते.
२००० ते २००६ या सहा वर्षांत तिने राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री आणि कंपनीला कर्ज दिलेल्या प्रत्येक बँकेची भेट घेतली. तिच्या प्रयत्नांमुळे बँकांनी व्याज, दंड आणि मुद्दलातील २४ टक्के माफ केले.
कर्ज फेडण्यासाठी तिने स्वतःची कल्याणमधील property विकली. २००९ मध्ये कंपनी SICA मधून बाहेर आली. २०१० मध्ये कंपनी पुन्हा सुरू झाली. आणि २०११ मध्ये कंपनीने ३ कोटींचा नफा कमावला.
ज्या कंपनीला कोणी हात लावायला तयार नव्हते, ती एका दलित स्त्रीने उभी केली.
२०१३ मध्ये भारत सरकारने तिला Padma Shri दिला. Trade and Industry क्षेत्रात. कोणतीही professional degree नसताना.
आज तिच्या सहा कंपन्या आहेत. ६०० हून अधिक कर्मचारी आहेत. एकत्रित turnover २००० कोटींपेक्षा जास्त आहे.
दोन रुपयांवर सुरू झालेला प्रवास आज ९१७ कोटींच्या net worth वर आहे.
कल्पना सरोज म्हणतात, त्या दिवशी विष प्यायले तेव्हा वाटले संपले सगळे. पण खरे तर तेव्हाच सुरुवात झाली होती.
बाराव्या वर्षी ज्या समाजाने तिचे स्वप्न चिरडले, त्याच समाजाला तिने सिद्ध केले की दलित मुलगी फक्त सहन करायला नाही जन्माला येत. ती उभारायलाही येते.












