आयफोनने चित्रीत लघुपट “ शोकेस ” ने पटकावला जिल्हापातळीवर द्वितीय क्रमांक

उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय रील, डॉक्युमेंटरी आणि शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पुण्यातील जवाहरलाल नेहरू प्रेक्षागृहात थाटात पार पडला. यावर्षीच्या स्पर्धेचा मुख्य विषय होता “ स्त्री ”.
या स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातून “शोकेस” या लघुपटाने द्वितीय क्रमांक पटकावला. या लघुपटाची खासियत म्हणजे यात ना अनुभवी कलाकार होते, ना महागडे तंत्रज्ञान, ना फिल्मी ड्रामा. या उलट संपूर्ण चित्रिकरण हे आयफोन 13 ने करण्यात आले होते. तरीही संपूर्ण राज्यातून आलेल्या ३५० चित्रपटांच्या शर्यतीमध्ये हा लघुपट स्वतःची वेगळी जागा बनवण्यात यशस्वी ठरला.
या यशामागे मुख्य कारण ठरले ते म्हणजे लघुपटाचा ठसठशीत विषय. सागर धायगुडे आणि भूषण कांबळे या दोन उगवत्या कलाकारांनी विषयाची अतिशय स्पष्ट आणि विचारपूर्वक अशी मांडणी केलेली आहे. तर मिहिका जोशी, मानसी जोशी आणि किशोर जोशी यांचा सहज आणि नैसर्गिक अभिनय लघुपटाची गंभीरता शेवटपर्यंत जपण्यात यशस्वी ठरतो. या लघुपटाचं दिग्दर्शन आणि छायांकन भूषण कांबळे आणि सागर धायगुडे यांनी केलेलं असून संकलन ह्रितिक म्हस्के यांनी केलं आहे. या व्यतिरिक्त रिया साने, श्रेया साने, निकुंज आगे, भाविका आगे, दुर्वा भुंजे आणि राजवीर भुंजे या बालकलाकारांनीही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

यानिमित्ताने “शोकेस”च्या संपूर्ण टीमने हे सिद्ध करून दाखवले की, आजच्या काळात हाय-टेक कॅमेरे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रचंड बजेट आणि ड्रामा वापरून बनवलेल्या चित्रपटांची तुफान स्पर्धा असली, तरीही जर तुमच्यात मूळ सामाजिक समस्या ओळखण्याची समज आणि त्याची जाणीव असेल, तर फक्त एका आयफोनद्वारेही तुम्ही स्वतःच्या कलाकृतीकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधू शकता.
सागरने या लघुपटासाठी छायांकनाची धुरा स्वतः सांभाळलेली असली तरीही तो स्वतः एक अभिनेता आहे. त्याने याआधी येक नंबर, गुलाबी, नवरदेव BSc agree, खाशाबा या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
लेखक-दिग्दर्शक म्हणून हा भूषणचा केवळ दुसरा लघुपट असून, “ ही तर फक्त सुरुवात आहे, अजून बरंच दूर जायचं आहे ” अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. तर कोणत्याही चित्रपटाच्या यशामध्ये अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक यांच्याबरोबरच लेखन, संकलन, छायांकन आणि संपूर्ण टेक्निकल टीम यांचा सुद्धा तितकाच सहभाग असतो अशी रोखठोक भूमिका मांडत, शोकेसच्या यशाचं श्रेय वैयक्तिक नसून आमच्या संपूर्ण टीमचं आहे हे मिहिकाने आवर्जून सांगितलं.
मकरंद अनासपुरे, अरुण नलावडे, प्रभाकर मोरे अशा दिग्गज अभिनेत्यांच्या हातून पारितोषिक मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि या सोहळ्या निमित्त त्यांनी केलेलं मार्गदर्शन आम्हाला आयुष्यभर लक्षात राहील असं मनोगत मानसी आणि किशोरने व्यक्त केलं. तसेच
या स्पर्धेनिमित्त कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या आयोजकांचे म्हणजेच बाबासाहेब पाटील, नितीन धवने पाटील, आदित्य संजयराव आणि अपेक्षा चव्हाण या सर्वांचे शोकेसच्या संपूर्ण टीमतर्फे विशेष आभार मानण्यात आले.
“ शोकेस ” हा लघुपट वरकरणी जरी फक्त भारतीय महिला क्रिकेटवर भाष्य करताना दिसत असला तरी लेखक सुप्तपणे आपल्या तीनही कथानकांद्वारे समस्त स्त्री समाजाच्या निर्णयस्वातंत्र्याच्या गळचेपीकडे लक्ष वेधताना दिसून येतो. लघुपट संपता-संपता स्क्रीनवर उमटणारा हा थेट प्रश्न “तुम्हाला तीन भारतीय महिला क्रिकेटपटूंची नावे माहिती आहेत का?” समाजाला जागं करून आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो. एकीकडे आपण भारतीय पुरुष क्रिकेटला डोक्यावर उचलून घेतलेलं असतानाच दुसरीकडे मात्र भारतीय महिला क्रिकेटबद्दल आपल्यामध्ये असलेली उदासीनता प्रकर्षाने आपल्या समोर येऊन उभी राहते.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें